दिवस शनिवार. सुट्टीचा. पत्नी बरोबर जरा बाहेर गेलेलो...वेळ सकाळी ११.३० ची. स्थळ पुणे, सिंहगड रोड, SBI बँके समोर, कडक उन पडलेले. मी बाईक दुकानासमोर लावलेली. एका शॉपिंग complex समोर गाडी लावलेली. आमचे काम संपवून आम्ही परत गाडीकडे आलो..सवयीनुसार मी गाडीची किल्ली ignition लॉक ला लावली. एक पाय गाडी भोवती फिरवून बसलो गाडीवर. आणि किल्ली फिरवून handle लॉक उघडू लागलो..पण हे काय ?? किल्ली फिरेचना...मी जोर लावून ignition लॉक ला लावलेली किल्ली फिरवू लागलो...पण हाय रे देवा...किल्ली तर अडूनच बसलेली.....ती फिरेचना.....मी कपाळावर आठ्या आणीत पत्नीकडे बघितले...ती आपली माझ्या कडे आशेने बघत होती....मी थोडासा कावरा बावरा...काय करावे...मी तिला एक स्मित दिले....परत जोर लावून किल्ली फिरवू लागलो..पण गाडी हट्टी आणि किल्ली हि....कुणीही हार मानायला तयार नव्हते ....मी कंटाळलो ...
त्रासिक चेहऱ्याने स्वताला शिव्या द्यायला लागलो....गाडीची सर्वीसिंग ची वेळ यायची होती.....सर्व काही ठीक होते...मग आज अचानक काय झाले हिला........माझी पत्नी पुढे आली...तिने ती किल्ली परत फिरवली...माझा त्रागा. ....म्हटले....हिला जर गाडीने ऐकले तर आपला पोपट व्हायचा...पण आज गाडी...हट्टी पणाचा कळस करत होती. तिलाही जुमेना.....ती चिडून मला बोलली ....."अहो बघत काय बसलात करा ना काहीतरी.."....मी परत शुद्धीवर आल्यासारखा इकडे तिकडे भरकटल्या सारखा बघत सुटलो...समोर एक होंडा चे सर्वीसिंग स्टेशन दिसले...मी चुम्बकासारखा तिकडे निघालो....तिथल्या एका माणसाला खुणेनेच बोलावले....चोपून भांग केलेला....बैठकीतला असावा बहुतेक...कपाळावर लाल टिळा लावलेला...निळा शर्ट pant घातलेला...तो जवळ आला...त्याला बोललो....."चावी अडकलीये लॉक मध्ये...फिरत नाहीये...जरा बघा ना"....माझा आपला हट्ट....त्याला खुणेने माझी गाडी दाखवली....त्याने....कंटाळलेली नजर टाकली....व माझ्या सोबत चालू लागला......मी उगाच बडबड करत सुटलो...."काय झाले काय माहिती....चावीच लागत नाहीये...".....वगेरे वगेरे...
त्याने माझ्या चावीचा आता ताबा घेतला....चाविला फिरविले....नाहीच.....त्याने...थोडे oil , कि होल मध्ये घातले...परत फिरवू लागला ....काही चालेना...त्याचे पारायण सुरु "....अहो चावी खराब झालीये....दाती खराब झालीत...ती बदला"...मी एका तांत्रिकाने मंतरल्या सारखा उभा....मान डोलवित हो हो करत सुटलो....त्याने परत थोडे ओईल घातले....परत फिरवू लागला.....पण सगळ व्यर्थ....अचानक..त्याला काहीतरी सुचल्या सारखे झाले..तो बोललो.."..अहो हि गाडी...तुमचीच ना??...". मी मागून फटक्याचा वार झाल्यासारखा....गाडीच्या नंबर कडे वाकून बघितले...अरे माझ्या कर्मा....नंबर चुकलेला.....वेगळाच नंबर ....हाय रे देवा...म्हणजे हि गाडी माझी नव्हतीच......मूर्खपणाचा कळस.....तो अपेक्षेने...माझ्या उत्तराची वाट पाहू लागला....आता पर्यंत मला कळून चुकलेले होते कि आपण कुणा दुसर्याच्या गाडीवर हा प्रयोग करत आहो....धीर एकवटला त्याला बोललो...."नाही ना.."....तो खो खो हसत सुटला....माझी पुरेवाट ...पत्नी शरमेने चूर चूर झाली....".अहो काय राव.....गाडी तरी नित बघत चला ...फुकट माझा वेळ घालवलात"....मी त्याच्या हाताची किल्ली हिसकली..व माझी गाडी शोधू लागलो.....बाजूच्या ४ गाड्या सोडून मला माझी गाडी दिसली......मी धाव घेतली...किल्ली लावली आणि काय आश्चर्य ...किल्ली लागली....अहो लागणारच ना...माझीच गाडी होती ती....मी पण शरमेने चूर....मला काहीही बोलवेना....मी परत त्याच्या कडे गेलो...बोललो ..."सॉरी....चूक झाली जरा...गडबडीत...." त्याला हसू आवरेना.....खो खो करत तो आपल्या जागेवर परत जावू लागला....मी त्याच्या मागे मागे....त्याच्या हातात १० ची एक नोट ठेवली....आलो परत गाडीकडे....वळून बघितले...तो सर्वांना माझी फजिती सांगत होता बहुतेक...सर्व हसत होते तिथे....
मी माझी गाडी सुरु केली आणि पत्नी ला म्हंटले "बस लवकर "...आतापर्यंत संयमात असलेली ती पण खो खो करत हसत सुटली ...आणि माझा पण तोल गेला आता...मी किक मारली गाडीला .....आणि खो खो करत मी पण हसू लागलो......काय झाले आपल्याला आज....पळा आता लवकर इथून .....नंतर बायको दिवसभर मला चिडवत होती.....मी आपला गप्प....अहो काय बोलणार....?
अश्विन शेंडे